स्त्रियांचा होणारा कौटुंबिक छळ आणि हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. दरम्यान आता अशीच एक घटना नशिकमधून समोर आली आहे. सासरच्यांचा जाचाला कंटाळून एका विवाहितेने आपले जीवन संपविले आहे. नोकरीच्या पगाराचे पैसे सासू सासऱ्यांना देण्यासाठी कथित दबाव, चारित्र्यावर संशय आणि माहेरील मालमत्ता हस्तांतरित करण्यासाठी तगादा लावल्याच्या आरोपांनंतर विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सातपूर परिसरात घडली.
दीपाली अनिल पवार (रा. नाशिक) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी तिचे वडील सयाजी रामदास गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी पती अनिल सोन्याबापू पवार, सासू सुशीला पवार आणि सासरे सोन्याबापू पवार यांना अटक केली आहे.
दीपालीचा विवाह २१ जानेवारी २०१४ रोजी अनिल पवार यांच्याशी झाला होता. त्यांना एक मुलगा असून दिपाली नोकरी करीत होती. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, पगाराच्या पैशांवरून तिच्यावर कथित दबाव आणला जात होता. तसेच पतीकडून तिच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अहिल्यानगर येथील दिपालीच्या नावावरील फ्लॅट पतीच्या भावाच्या नावावर करण्यासाठीही तिच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप फिर्यादीत आहे. या कथित छळामुळे ती मानसिक तणावाखाली होती, असे माहेरच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. ४ ऑक्टोबर रोजी दीपालीने विषारी औषध सेवन केले. प्रकृती गंभीर झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम १०८ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सुनील पवार, सुवर्णा पवार, रेखा किशोर धोत्रे व किशोर धोत्रे यांच्या भूमिकेचाही तपास सुरू असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.