गेल्या 19 दिवसांपासून शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे दिल्लीतल्या जंतर-मंतर याठिकाणी उपोषण करत आहेत. देशभरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अनेकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. आता बॉलिवूड अभिनेता आमीर खाननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोनम वांगचुक यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि लवकरात लवकर सकारात्मक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करत '३ इडियट्स' चित्रपटातील रांचो हे पात्र त्यांच्यावर आधारित नसल्याचे स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वीच ‘3 इडियट्स’मध्ये चतुरची भूमिका साकारणारा अभिनेता ओमी वैद्यने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. “फुंगसूक वांगडूला आम्ही मरताना नाही पाहू शकत”, असं तो या व्हिडीओत म्हणाला होता. ‘3 इडियट्स’मध्ये आमिर खानने साकारलेली फुंगसूक वांगडूची भूमिका सोनम वांगचूक यांच्यात आयुष्यावर आधारित असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यावर आता आमिर खानने स्पष्टीकरण दिलं आहे.
काय म्हणाला आमिर खान?
नुकत्याच एका कार्यक्रमात आमिर खानला ‘3 इडियट्स’मधील त्याच्या भूमिकेवरून प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी सोनम वांगचूक यांच्या आयुष्यावर आधारित त्यातील कोणतीच भूमिका नव्हती, असं आमिरने स्पष्ट केलं. तो पुढे म्हणाला, “नाही, हा एक गैरसमज आहे. जेव्हा आम्ही ‘3 इडियट्स’ हा चित्रपट बनवत होतो, तेव्हा मला सोनम वांगचूक यांच्याबद्दल माहितीच नव्हतं. मी नुकताच चतुरचा (ओमी वैद्य) व्हिडीओ पाहिला होता. त्यात त्याने जे म्हटलंय, ते चुकीचं आहे. मी तुम्हाला सांगतो की ना राजकुमार हिरानी, ना अभिजीत जोशी, जे दोन लेखक आहेत, ना मी.. आमच्यापैकी कोणालाच सोनम यांच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं.”
यावेळी सोनम वांगचूक यांच्या कामाबद्दल आमिर म्हणाला, “ते खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचं काम खरंच कौतुकास्पद आहे. आपल्या मनात त्यांच्याबद्दल आदराची भावना असण्यासाठी त्यांचं ‘3 इडियट्स’मधल्या कुठल्याही पात्रावर आधारित राहणं गरजेचं नाही. त्यांनी आजवर जे काही काम केलं, ते उत्तमच आहे. परंतु मी हे स्पष्ट करू इच्छितो की, आमच्यापैकी कोणालाच त्यांच्याविषयी माहित नव्हतं. इतकंच नव्हे तर, खुद्द सोनम वांगचूक यांनी याविषयी आधीच स्पष्ट केलं होतं की त्यांच्यावर ती भूमिका आधारित नाही.”