मदतीला धावले अन् जीव गमावला! एकापाठोपाठ तिघे उतरले अन् घडली भयंकर दुर्घटना
मदतीला धावले अन् जीव गमावला! एकापाठोपाठ तिघे उतरले अन् घडली भयंकर दुर्घटना
img
Nandini khandare More
सांगली जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शौचालयाचा शोषखड्डा साफ करण्यासाठी एक कामगार आत उतरला, मात्र तो बाहेर न आल्याने त्याला वाचवण्यासाठी अन्य दोघांनीही खड्ड्यात प्रवेश केला. पण दुर्दैवाने तिघांनाही आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकी ही दुर्घटना कशी घडली? पाहूया सविस्तर.

सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण येथे शौचालयाच्या शोषखड्ड्याची सफाई करताना गुदमरून तिन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. तुषार कोष्टी, अक्षय बागडे आणि यशवंत शेळके अशी मृत कामगारांची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरढोण येथील एका हॉटेलच्या मागे असलेल्या शौचालयाचा शोषखड्डा साफ करण्यासाठी एकूण पाच कामगार गेले होते. सफाईचे काम सुरू असताना यशवंत शेळके हे सर्वप्रथम खड्ड्यात उतरले. मात्र, बराच वेळ होऊनही ते वर न आल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने वर उभे असलेले इतर कामगार घाबरले.

शेळके यांना पाहण्यासाठी आणि बाहेर काढण्यासाठी तुषार कोष्टी आणि अक्षय बागडे हे दोघेही एकामागून एक खड्ड्यात उतरले. मात्र, शोषखड्ड्यातील विषारी वायूमुळे तिघांचाही श्वास गुदमरला आणि तिघेही आतच अडकून पडले. दुर्दैवाने या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

पोलिसांची कारवाई या घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने तिन्ही कामगारांचे मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले असून ते पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या तिघांचा मृत्यू श्वास गुदमरून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group