जून महिन्यात शांतता घेतलेल्या पावसाने जुलै महिन्यात चांगली एंट्री घेतली होती पण आता पुन्हा एकदा पाऊस गायब झाला असून उकाडा निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. राज्यात आज वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर उर्वरीत राज्यात मात्र हलक्या पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके लागणार असून उकाडा कायम राहिल.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोसळणार मुसळधार आज कोकणातील ठाणे, रायगड या जिल्ह्यांमध्ये, मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा याठिकाणी आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. या ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर ठाणे, मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सातारा घाटमाथा, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचसोबत अनेक जिल्ह्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ज्या जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे त्याठिकाणच्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे.