आजकाल ल बऱ्याच कार्यक्रमांसाठी अनेकदा सेलिब्रेटींना आमंत्रित केले जाते. सेलिब्रेटी या उपस्थितीची मानधन ही घेत असतात. परंतु कधी कधी मानधन घेऊनही काही सेलेब्रिटी कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याने आयोजकांचे मोठे नुकसान होते. दरम्यान आता अशीच एक घटना उघडकीस आली आहे.
कार्यक्रमासाठी मानधन स्वीकारूनही ऐनवेळी पाठ फिरवणाऱ्या अभिनेत्रीला नाशिक जिल्हा ग्राहक (Nashik Consumer Court) तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. “मानधन स्वीकारणारा सेलिब्रिटी हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ‘सेवा पुरवठादार’ मानला जाऊ शकतो आणि अशा सेवांनाही ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ लागू होतो,” असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय आयोगाने दिला आहे.
याप्रकरणी हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जीयांनी घेतलेले ३ लाख ९ टक्के व्याजासह परत करावेत, तसेच १ लाख नुकसानभरपाई आणि २५ हजार तक्रार खर्च म्हणून तक्रारदाराला द्यावेत, असा आदेश आयोगाने दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारदार डॉ. अरुणा वानखेडे यांनी गोवा येथे त्यांच्या सहकाऱ्यांसाठी एका स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहण्यासाठी त्यांनी अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांना निमंत्रित केले होते आणि त्यासाठी ३ लाख इतके मानधन आगाऊ (Advance) दिले होते.
विशेष म्हणजे, मौसमी चॅटर्जी या गोव्यात पोहोचल्या, मात्र तरीही त्या नियोजित कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. सेलिब्रिटींच्या या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचे नियोजन कोलमडले, आयोजकांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. याविरुद्ध डॉ. वानखेडे यांनी नाशिक जिल्हा ग्राहक आयोगात दाद मागितली होती.
दरम्यान, या प्रकरणात तक्रारदार डॉ. अरुणा वानखेडे यांच्यावतीने अॅड. दीप्ती विद्देश नाशिककर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. कायदेतज्ज्ञांच्या मते, ग्राहक चळवळीला बळ देणारा आणि सेलिब्रिटींना जबाबदारीची जाणीव करून देणारा हा निर्णय अत्यंत मार्गदर्शक ठरेल.
आयोगाचा महत्त्वाचा निर्णय आणि दणका
या प्रकरणाची सुनावणी आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती शिल्पा एस. डेल्हारकर, सदस्या सौ. प्रेरणा लोणकर आणि सौ. कविता ए. चव्हाण यांच्या न्यायासनासमोर झाली. दोन्ही बाजूंचे दस्तऐवज आणि पुरावे तपासल्यानंतर आयोगाने मौसमी चॅटर्जी यांच्याकडून ‘सेवेत त्रुटी’ (Deficiency in Service) झाल्याचे स्पष्ट केले.
आयोगाचे आदेश
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी स्वीकारलेली ₹३ लाखांची रक्कम १८ नोव्हेंबर २०२३ पासून ९% वार्षिक व्याजासह तक्रारदाराला परत करावी.
तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी ₹१ लाख नुकसानभरपाई द्यावी.
तक्रार खर्चापोटी अतिरिक्त ₹२५ हजार अदा करावेत.
या निकालाचे महत्त्व का आहे?
सेलिब्रिटी आता ‘सेवा पुरवठादार’: मानधन घेणारा कोणताही सेलिब्रिटी हा कायद्यानुसार ग्राहकाला सेवा देणारा व्यक्ती ठरतो.
आयोजकांना संरक्षण: केवळ सेलिब्रिटी शोच नव्हे, तर व्याख्याने, उद्घाटने, व्यावसायिक उपस्थिती किंवा प्रचार कार्यक्रमांसाठी मानधन घेऊन ऐनवेळी फसवणूक करणाऱ्यांविरोधात आता थेट ग्राहक न्यायालयात जाता येईल.