अजब प्रेम की गजब कहाणी ! गर्लफ्रेंडचा रुसवा घालवण्यासाठी चक्क कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर ; पण पुढे झालं असं काही ...
अजब प्रेम की गजब कहाणी ! गर्लफ्रेंडचा रुसवा घालवण्यासाठी चक्क कॉलेजसमोर लावला ‘सॉरी’चा बॅनर ; पण पुढे झालं असं काही ...
img
Nandini khandare More
प्रेमयुगुल प्रेमात एकमेकांसाठी काय करतील याच एकही नेमच नसतो. प्रेमात रुसवे फुगवे या गोष्टी सुरूच असतात. पण आपल्या  गर्लफ्रेंडचा रुसवा घालवण्यासाठी एका पठ्ठयाने एक अजब शक्कल लढवली आहे. 

नाशिकमधील एका तरुणाने गर्लफ्रेंडचा रुसवा घालवण्यासाठी चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, प्रेयसीची माफी मागण्याचा हा प्रयत्न तरुणाला चांगलाच महागात पडलाय. सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर लावून मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी तरुणासह बॅनर छापून देणाऱ्या प्रिंटिंग प्रेस चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र अशा या आगळ्यावेगळ्या सॉरीची चर्चा जिल्ह्यात रंगलीय. 

नेमकं प्रकरण काय ?
दिंडोरी रोडवरील  एका कॉलेजसमोर चार दिवसांपूर्वी सकाळच्या सुमारास झाडावर मोठा बॅनर लावलेला आढळून आला. गुलाबी आणि लाल रंगातील बदामाच्या आकृत्यांसह त्यावर मोठ्या अक्षरांत ‘SORRY’ असे लिहिण्यात आले होते. हा बॅनर पाहिल्यानंतर परिसरात त्याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र, बॅनर लावण्यासाठी पोलिस किंवा महापालिकेची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार दीपक अरगडे गस्तीवर असताना त्यांना या बॅनरची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला आणि बॅनर तातडीने काढून टाकला. 

बॅनर छापला अन् रात्री झाडावर लावला
यानंतर बॅनर कोणी लावला, याचा तपास सुरू करण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला. या तपासात ‘श्री आर्ट डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग’चे चालक रूपेश सुदाम लोहार यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले. चौकशीत या बॅनरसाठी रविवार पेठ परिसरातील २७ वर्षीय आदित्य गणेश शेलार (Aditya Ganesh Shelar) याने ऑर्डर दिल्याचे समोर आले. प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी आदित्यने बॅनर छापून घेतला आणि रात्रीच्या वेळी कॉलेजसमोरील झाडावर तो लावल्याची माहिती तपासात पुढे आली.

आगळ्यावेगळ्या माफीची चर्चाच चर्चा
प्रेयसीची माफी मागण्याचा हा अनोखा प्रयत्न परिसरात चर्चेचा विषय ठरला असला, तरी सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली आहे. महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा, १९९५ मधील कलम ३ अंतर्गत म्हसरूळ पोलिस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रेमात रुसवा-फुगवा असतोच, मात्र माफी मागताना कायद्याच्या चौकटीचेही भान ठेवणे गरजेचे आहे, हे या घटनेतून पुन्हा समोर आले आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group