ठाकरे गटाला मोठा धक्का ! ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरे गटाला मोठा धक्का ! ४ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश
img
Nandini khandare More
गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला मोठे राजकीय हादरे बसत असून ठाकरे गटाच्या पक्षाला काही लागलेली गळती काही केल्या थांबत नसून आता धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे सेनेला मोठा राजकीय धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या ४ नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश झाल्याने धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे नगरसेवक प्रदीप मुंडे, नाना घाडगे, सोनाली उंबरे आणि केसरबाई करवर यांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. या चार नगरसेवकांच्या प्रवेशामुळे धाराशिव नगरपरिषदेत ठाकरे गटाचे आता केवळ तीन नगरसेवक उरले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर ठाकरे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे, हे चारही नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, प्रवेश भाजपऐवजी शिवसेना शिंदे गटात झाल्याने राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या राजकीय घडामोडीला स्थानिक पातळीवर ‘ऑपरेशन टायगर’च्या यशाशी जोडले जात आहे.

दरम्यान, कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता धाराशिवमधील चार नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. विशेषतः धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी काळात धाराशिव नगरपरिषदेत या पक्षांतराचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चार नगरसेवकांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाची नगरपरिषदेतील ताकद वाढली असून आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group