धक्कादायक ! 1 लाख रुपयांना विकल्या जाणाऱ्या ''या'' कॅन्सर इंजेक्शच्या नावाखाली चक्क पाणी ?
धक्कादायक ! 1 लाख रुपयांना विकल्या जाणाऱ्या ''या'' कॅन्सर इंजेक्शच्या नावाखाली चक्क पाणी ?
img
Nandini khandare More
एका  कॅन्सर इंजेक्शबाबत धक्कादायक माहिती समोर आली  आहे.  कॅन्सरच्या एका इंजेक्शनमध्ये औषधाऐवजी फक्त पाणी असल्याचे चाचणीत समोर आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, 1 लाख रुपयांना विकल्या जाणाऱ्या ‘ॲव्हेलुमॅब’ इंजेक्शनमध्ये औषधाऐवजी फक्त पाणी असल्याचे चाचणीत समोर आले. जर्मन ‘मर्क’ लॅबच्या तपासणीत कर्करोगाशी लढणारा मुख्य घटकच इंजेक्शनमध्ये नसल्याचे स्पष्ट झाले. तसेच, राजस्थान सरकारच्या योजनेतून कर्करोग रुग्णांना दिली जाणारी औषधेही काळ्या बाजारात विकल्याचा आरोप आहे.

20 ऑगस्ट रोजी दिल्ली गुन्हे शाखेने सात राज्यांमध्ये पसरलेल्या सुमारे 9 कोटी रुपयांच्या कर्करोग औषध रॅकेटचा पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी कारवाईदरम्यान कर्करोगावरील औषधांच्या 588 भरलेल्या आणि 6 रिकाम्या बाटल्या, औषधांचे 7 रिकामे बॉक्स, इतर औषधांची 3,021 पाकिटे आणि सुमारे 50 लाख रुपये रोकड जप्त केली.

जप्त करण्यात आलेल्या औषधांमध्ये डार्झालेक्स, इम्फिन्झी, अर्बिटक्स, ऑपडायटा, गॅझिवा, बॅवेन्सियो, ॲडसेट्रिस आणि कीट्रुडा यांसारख्या महागड्या कर्करोगावरील औषधांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सात राज्यांमध्ये पसरले होते रॅकेट

पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीचे जाळे दिल्ली-एनसीआर, मुंबई, हैदराबाद, हरियाणा, उत्तर प्रदेश यांसह अनेक भागांत पसरले होते. 22 जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर पूर्व दिल्ली, रोहिणी आणि मुंबईतील संशयित ठिकाणांची माहिती मिळवण्यात आली.

11 जुलै रोजी सात पोलिस पथकांनी अंमली पदार्थ विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने दिल्ली व नवी मुंबईत एकाच वेळी छापे टाकले. चौकशी आणि शोधमोहीम राबवल्यानंतर या प्रकरणात एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली.
इतर बातम्या
Join Whatsapp Group