अमेरिकेने लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म TikTokला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या गोपनीयतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी TikTok आणि त्याची मूळ कंपनी ByteDance यांच्याविरोधातील प्रकरणात तब्बल 400 दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे 3,300 कोटी रुपयांचा समझोता करण्यात आला आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने केलेल्या या कारवाईमुळे TikTokच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. नेमकं TikTokकडून काय चूक झाली आणि अमेरिकेने एवढी मोठी कारवाई का केली, जाणून घेऊया.
भारतात काही वर्षांपूर्वी टिकटॉकसह अन्य चिनी कंपन्यांच्या अॅपवर बंदी घालण्या आली. मात्र, जगभरातील विविध देशांमध्ये टिकटॉक अद्याप सुरु आहे. अमेरिकेमध्ये टिकटॉक आणि त्यांची मूळ कंपनी बाइटडान्सला लहान मुलांच्या ऑनलाईन गोपनीयतेसंदर्भात मोठा धक्का बसला आहे. आई वडिलांच्या परवानगीशिवाय लहान मुलांची माहिती टिकटॉककडून जमा करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.
लहान मुलांची ऑनलाइन सुरक्षा आणि त्यांच्या डेटाच्या गोपनीयतेसंदर्भातील हे प्रकरण आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांनुसार टिकटॉकनं 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या डेटासंदर्भातील नियमांचं पालन केलं नाही.
टिकटॉक किती रक्कम भरणार?
अमेरिकन न्याय विभागाच्या माहितीनुसार, तडजोडीचा भाग म्हणून टिकटॉकला तातडीनं 300 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 2500 कोटी रुपयांचा दंड भरावा लागेल. याशिवाय Musical.ly शी संदर्भातील जुना आदेश रद्द करण्यासाठी कंपनीला 100 दशलक्ष डॉलर जमा करावे लागतील, भारतीय चलनात त्याचं मूल्य 830 कोटी रुपये आहे. म्हणजेच कंपनीला एकूण 400 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनात 3300 कोटी रुपये भरावे लागतील.
COPPA (Children's Online Privacy Protection Act) हा अमेरिकेमधील एक कायदा आहे, त्यानुसार कंपन्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय 13 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची माहिती जमा करु शकत नाहीत. टिकटॉककडून या नियमाचं पालन करण्यात आलं नाही, असा आरोप अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
टिकटॉकवर आरोप का लागले?
अमेरिकन न्याय विभाग आणि फेडरल ट्रेड कमिशननं 2024 मध्ये टिकटॉक विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये 13 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांसाठी बनवण्यात आलेल्या Kids Mode मध्ये खातं उघडण्यासाठी ईमेल आयडी आणि दुसरी वैयक्तिक माहिती जमा केली गेल्याचा दावा करण्यात आला होता. ज्यामुळं लाखो मुलांची ऑनलाइन सुरक्षा अडचणीत आली होती.
Musical.ly शी संबंधित प्रकरण?
हे प्रकरण फक्त टिकटॉकशी संबंधित नाही, मात्र यापूर्वी 2019 मध्ये अमेरिकेनं Musical.ly च्या विरोधात COPPA शी संबंधित खटला दाखल केला होता. ByteDance ने 2017 मध्ये Musical.ly ला खरेदी केलं होतं, मात्र त्यानंतर त्याला TikTok सोबत जोडण्यात आलं.