राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून आता नांदेडच्या लोहा तालुक्यातील सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तीन वर्षीय चिमकुलीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथील एका गावात तीन वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेटचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी पीडित बालिकेच्या आईच्या फिर्यादीवरून सोनखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा कसून शोध सुरू आहे.
सोमवारी सायंकाळी पीडित चिमुकली घरासमोरील अंगणात खेळत होती. त्याचवेळी शेजारी राहणाऱ्या नातेवाईक व्यक्तीने तिला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून सोबत नेले. साधारण 20 ते 25 मिनिटांनंतर तो मुलीला पुन्हा घरी सोडून निघून गेला. मुलगी रडत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. त्यामुळे, आईने विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तीने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचे तिने सांगितले मुलीला दुखापत झाल्याचे निदर्शनास येताच पालकांनी तिला तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
सध्या तिच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून संशयिताविरुद्ध पोक्सो आणि अन्य संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अत्याचारातील घटनेतील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून विविध कलमान्वये आरोपी विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी दिली आहे.