शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याला चक्क वर्गणीसाठी धमकावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. वर्गणीचे पैसे दिले नाहीत, तर थेट परीक्षेत नापास करण्याची धमकी शिक्षिकेने दिल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.
नागपुरात अवघ्या ३०० रुपयांसाठी दहावीच्या विद्यार्थ्याला नापास करण्याची धमकी दिल्याचा हा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या कार्यक्रमासाठी पैसे न दिल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील एका शाळेत दहावीच्या विद्यार्थ्याकडे कार्यक्रमासाठी ३०० रुपये मागण्यात आले होते.
मात्र, विद्यार्थ्याने पैसे न दिल्याने शिक्षिका मंजुषा गेडाम यांनी त्याला परीक्षेत नापास करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. इतकेच नाही, तर शिक्षिकेने विद्यार्थ्याचा चेहरा हाताने पकडल्याचाही आरोप आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबीयांमध्ये नाराजी निर्माण झाली. प्रकरण गंभीर असल्याने याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे सीताबर्डी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षिकेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आता पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.