दात कोरण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतात, मात्र जळगावमधील एका तरुणीला हा प्रकार चांगलाच महागात पडला आहे. दात स्वच्छ करण्यासाठी तिने सेफ्टी पिनचा वापर केला आणि त्यातून अनपेक्षित घटना घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा दातांच्या स्वच्छतेबाबत निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो, हे समोर आलं आहे.
जळगावमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.जळगावमध्ये सेफ्टी पिनने दात टोकरत असताना पीन तरुणीच्या पोटात गेल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करुन ती पिन काढली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जळगावात दात कोरताना १८ वर्षीय तरुणीने सेफ्टी पीन गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणी दात टोकरत असताना तिच्याकडून चुकून पिन पोटात गेली. टोकदार सेफ्टी पीन अन्ननलिकेत अडकल्याने कुटुंबीय चांगलेच घाबरुन गेले. त्यांनी तात्काळ तरुणीला रुग्णालयात नेले. टोकदार सेफ्टी पीन अन्ननलिकेत अडकल्याने वैद्यकीय पथकासमोरही मोठे आव्हान होते.
सुदैवाने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांकडून तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरीने शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी अन्ननलिकेतून पीन काढली. तरुणीच्या अन्ननलिकेतून पीन निघाल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत तरुणीचा जीव वाचवला. यावेळी टोकदार वस्तूंनी दात कोरण्याची सवय जीवघेणी ठरू शकते, असा सावधगिरीचा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.