नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलाने 17 वर्षीय युवतीवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिडको परिसरात घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी युवती ही 11 वीत शिक्षण घेत आहे. 25 नोव्हेंबर रोजी मैत्रीणीसोबत कॉलेज परिसरात ती उभी असताना तिच्या ओळखीचा अल्पवयीन आरोपी मुलगा तिच्या पाठोपाठ आला. तिच्या घरापासून पाठलाग करुन दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास तो कॉलेज परिसरात आला. मैत्रीणीसमवेत जात असताना त्या मुलाने तिला आडवत ‘तु माझ्यासोबत रिलेशनशीप ठेवणार आहे की नाही, व माझ्यासोबत येणार आहे की नाही’, असे म्हणाला. तिने नकार देताच त्याने तिला जवळ ओढून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे, कृत्य केले.
त्यावेळी युवतीने आरडाओरड सुरू करताच आरोपी मुलाने त्याच्याजवळील चाकू काढून तिच्या दिशेने फिरवला. तिने तो वार चुकवल्याने सुदैवाने ती बचावली. ‘तु माझ्या सोबत रिलेशनशिप ठेवली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नाही’, अशी धमकी देऊन तिला शिवीगाळ केली.
युवतीने आरडाओरड सुरू केल्याने गर्दी जमा होऊ लागल्याचे लक्षात येताच तो तिथून पळून गेला. याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरुन अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बागूल करीत आहे.