नैताळे येथे भरदिवसा गोळीबार; एक जण गंभीर जखमी
नैताळे येथे भरदिवसा गोळीबार; एक जण गंभीर जखमी
img
दैनिक भ्रमर

निफाड (भ्रमर प्रतिनिधी) :- राज्यात गोळीबाराच्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच निफाड तालुक्यातील नैताळे येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीजवळ दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत श्रावण सुरेश पिंपळे अंदाजे वय 33 हा तरुण गंभीर जखमी झाला असून, घटनेमुळे संपूर्ण नैताळे गावात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, श्रावण सुरेश पिंपळे आणि राहुल वाघमारे हे दोघे नैताळे गावातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या वडाच्या झाडाखाली थांबले होते. यावेळी संभाजीनगर येथे दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या संदर्भात त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान गावठी कट्ट्यातून गोळी झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गोळीबारात श्रावण पिंपळे याच्या पाठीमागील बाजूस कमरेजवळ गोळी लागली.

गोळी लागल्याने श्रावण पिंपळे यांना तातडीने निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना नाशिक येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. श्रावण या जखमीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर गोळीबाराच्या घटनेची माहिती समोर आली.

माहिती मिळताच निफाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी गुन्हे अन्वेषण पथक / फॉरेन्सिक पथकही दाखल झाले होते. गोळीबार झालेल्या ठिकाणची पाहणी करून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे.या घटनेनंतर गोळीबार केल्याचा संशय असलेला अहिल्यानगर येथील राहुल वाघमारे हा घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी निफाड पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नैताळेसारख्या गावात भरदिवसा गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गोळीबारामागील नेमके कारण काय..?, संभाजीनगर येथील गुन्ह्याचा या घटनेशी काय संबंध आहे आणि गोळीबारासाठी वापरण्यात आलेला गावठी कट्टा कुठून आणण्यात आला, याचा तपास आता निफाड पोलीस करीत आहेत.

दरम्यान या घटनेमुळे नैताळे शहर व परिसरातील नागरिक भयभीत झाली असून परिसरामध्ये सर्रासपणे वारंवार छोट्या मोठ्या घटना घडत असून परिसरात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असल्याने गुन्हेगारांचा वावर वाढला आहे याबाबत पोलिसांनी दखल घेण्याची गरज ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group