* नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात पती-पत्नीचे समुपदेशन
नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):-टीसीएस प्रकरणामुळे कुटुंबाला वाईट अनुभवांचा सामना करावा लागला असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच समाजात लोकांमध्ये जाणेही अवघड झाले आहे, असे निदा खानचा पती मोईन नाविद खान याने फॅमिली कोर्टात म्हटले आहे. पहिल्या समुपदेशनानंतरही मोईन घटस्फोट घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहे.
टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खान हिच्याविरुद्ध तिचा पती मोईन नाविद खान याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) नाशिक रोड येथील कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनाची प्रक्रिया झाली. यादरम्यान पती-पत्नी समोरासमोर उपस्थित होते. कोर्टाच्या सूचनेनुसार दोघांचे समुपदेशन करण्यात आले.
मोईनने कोर्टात सांगितले की, टीसीएस प्रकरण समोर येण्यापूर्वीपासूनच निदाचे घरातील वर्तन ठीक नव्हते. टीसीएस प्रकरणामुळे कुटुंबाला वाईट अनुभवांचा सामना करावा लागला. या प्रकरणावरून झालेला मानसिक त्रास आणि समाजात लोकांमध्ये वावरताना येणाऱ्या अडचणींचाही त्याने उल्लेख केला.
पहिल्या समुपदेशनानंतर कोर्टाने दोन्ही बाजूंना विचार करण्यासाठी वेळ दिला आहे. मात्र, मोईनने घटस्फोट घेण्याच्या आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटस्फोटाच्या अर्जावर आता २० नोव्हेंबर २०२६ रोजी पुढील सुनावणी होईल. अर्जदार मोईन नाविद खान यांच्यातर्फे एडवोकेट नितीन पंडित, तर प्रतिवादी निदा खान यांच्यातर्फे एडवोकेट शोभा ताजनपुरे बाजू मांडत आहेत.
टीसीएस प्रकरणात संशयित म्हणून निदा खानचे नाव समोर आल्यानंतर आता तिच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित हे प्रकरणही न्याय प्रक्रियेत पोहोचले आहे.