पीडित मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू; शेतकरी वसंत हिरे पोलिसांच्या ताब्यात
नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी) : बोरं तोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन शाळकरी मुलींना शिवीगाळ करीत अमानुषपणे मारहाण केल्याची संतापजनक घटना मालेगाव-नामपूर रस्त्यावरील काष्टी गावात घडली. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर परिसरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी संबंधित शेतकरी वसंत दगा हिरे (वय ६५, रा. काष्टी) याला ताब्यात घेतले असून, मारहाण झालेल्या मुली आणि त्यांच्या आईचा शोध सुरू आहे. मुलींचा शोध लागल्यानंतर त्यांच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नाशिक ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील मालेगाव परिसरात वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काष्टी गाव आहे. या गावातील वसंत दगा हिरे यांची मालेगाव-नामपूर रस्त्यालगत शेती असून, या शेतीला लागूनच बोराचे झाड आहे. संविधान दिनाच्या दिवशी म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक महिला आपल्या दोन मुलींसह या रस्त्याने जात होती. यावेळी रस्त्यालगत असलेल्या बोराच्या झाडाला लगडलेली बोरं पाहून मुलींना ती खाण्याचा मोह झाला. त्यामुळे त्यांनी झाडावरील काही बोरं तोडून खाण्यास सुरुवात केली. मात्र, ही बाब शेतकरी वसंत हिरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी मुलींना रस्त्यात अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन्ही मुलींना बेदम मारहाण केली. यावेळी एका मुलीला मारहाण करून रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा अमानुष प्रकार घडला. सोबत असलेली त्यांची आई मुलींना सोडून देण्यासाठी वारंवार गयावया करीत होती. मात्र, शेतकऱ्याने तिचेही ऐकले नाही. रस्त्याने जाणाऱ्या काही नागरिकांनी हा प्रकार पाहून आपली वाहने थांबविली आणि शेतकऱ्याला जाब विचारला. मात्र, त्यांनाही त्याने अरेरावी केल्याचे व्हायरल व्हिडिओतून दिसून येत आहे.
दरम्यान, संबंधित महिला आणि दोन्ही मुली तेथून निघून गेल्यानंतर या घटनेचा व्हिडिओ एका अज्ञात व्यक्तीने चित्रित करून समाजमाध्यमांवर प्रसारित केला. पाहता पाहता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मुलींना झालेल्या मारहाणीचे दृश्य समोर आल्यानंतर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येऊ लागला. सोशल मीडियावरही या घटनेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांनी तातडीने संबंधित महिला व मुलींचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.
पीडित महिला व मुली अद्याप पोलिसांना मिळून न आल्याने तसेच व्हायरल व्हिडिओतील घटनेची खातरजमा केल्यानंतर वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार प्रशांत नामदेव सोमवंशी यांनी मुलींना अमानुषपणे मारहाण झाल्याप्रकरणी वसंत दगा हिरे यांच्याविरोधात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी वसंत हिरे यांना ताब्यात घेतले आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून, पीडित मुलींचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. मुली पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांच्या तक्रारीनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यानुसार गुन्ह्यात आवश्यक कलमांची वाढ करून कारवाई केली जाणार असल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या घटनेबाबत संबंधित शेतकरी वसंत दगा हिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आपल्याकडून चुकून हा प्रकार घडल्याचे सांगितले. तसेच घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, मुलींना झालेली मारहाण आणि त्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. संबंधित शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आता पोलिसांच्या पुढील कारवाईला त्याला सामोरे जावे लागणार आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेंद्र बागुल करीत आहेत.