भाविकांनो लक्ष द्या ! त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस बंद; प्रशासनाचा आदेश जारी
भाविकांनो लक्ष द्या ! त्र्यंबकेश्वर मंदिर दोन दिवस बंद; प्रशासनाचा आदेश जारी
img
Nandini khandare More
त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी! नाशिकमधील प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी जाण्याचं नियोजन करणाऱ्या भाविकांनी ही बातमी आवर्जून जाणून घ्यायला हवी. मात्र, मंदिर नेमकं कोणत्या तारखांना बंद राहणार आहे? मंदिर बंद ठेवण्यामागचं कारण काय आहे? आणि दर्शन पुन्हा कधी सुरू होणार? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. 

२०२७ साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे  ध्वजारोहण शनिवारी (दि.३१ ऑक्टोबर) रोजी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नाशिक येथे रामकुंडावर तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते त्र्यंबकेश्वर  येथील कुशावर्त कुंडावर होणार आहे. दोन्ही ठिकाणी दुपारी १२ वाजून २ मिनिटांनी हा सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एक पत्रक जारी केले आहे. या पत्रकात आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यासाठी देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह इतर अति महत्त्वाचे नेते त्र्यंबकेश्वर येथे उपस्थित राहणार आहेत.कॅलेंडर पहा

या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था, व्हीव्हीआयपी सुरक्षा आणि गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी शुक्रवार (दि.३० ऑक्टोबर) रोजी सकाळी १२:०० वाजेपासून ते शनिवार (दि. ३१ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत (किंवा कार्यक्रम संपेपर्यंत) त्र्यंबकेश्वर मंदिर व कुशावर्त तीर्थ सामान्य भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.कॅलेंडर पहा

कोणाला मिळणार प्रवेश?

त्र्यंबकेश्वर शहरातील स्थानिक रहिवासी वगळून इतर सर्व बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था पूर्णपणे बंद असणार आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून किंवा त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे वितरीत करण्यात आलेल्या अधिकृत दर्शन पासधारक व्यक्तींनाच या कालावधीत प्रवेश दिला जाईल. ज्या नागरिकांकडे किंवा भाविकांकडे अधिकृत पास नसेल, त्यांना मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

राष्ट्रपतींच्या दोन दिवसीय (३० आणि ३१ ऑक्टोबर) दौऱ्याच्या नियोजनाबाबत पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण), त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सचिव आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ नुसार हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा

दरम्यान प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, जारी करण्यात आलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम १३४ नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे भाविकांनी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group