नाशिकच्या सिडको परिसरातून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. लिकर शॉपमध्ये काम करणाऱ्या ३९ वर्षीय कर्मचाऱ्याचा प्रेशर गनमधून सुटलेला लोखंडी खिळा छातीत घुसल्याने मृत्यू झाला आहे. सुनील अनिल तायडे असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरातील लिकर कट्टा या दुकानात २ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. सुरुवातीला हा अपघात असल्याचं मानलं जात होतं; मात्र घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. हा निव्वळ अपघात होता की यामागे काही घातपात आहे, याचा तपास अंबड पोलीस करत आहेत.
सिडको परिसरातीलस्टेट बँक चौकाजवळ असलेल्या लिकर कट्टा दुकानात ही विचित्र दुर्घटना घडली आहे. दुकानात (Shop) काम करत असताना प्लायवुडचे खिळे ठोकण्याच्या प्रेशर गनमधून (नॅमॅटिक गन) अचानक फायर होऊन सुटलेला खिळा थेट लिकर सेल्समनच्या पोटात शिरल्याने गंभीर दुखापत झाली. उपचारादरम्यान या कामगाराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनील अनिल तायडे (वय ३९, रा. सी-१२, इन्कमटॅक्स कॉलनी, अंबड लिंक रोड, नाशिक) असे मृत कामगाराचे नाव आहे. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास सुनील तायडे हे सिडको येथील स्टेट बँक चौकाजवळ असलेल्या लिकर कट्टा दुकानाच्या काउंटरवर बसले होते. यादरम्यान दुकानात किंवा आजूबाजूला प्लायवुडचे (लाकडाचे) काम सुरू असताना अचानक खिळे ठोकण्याच्या प्रेशर गनमधून फायर झाले. मशिनमधून सुटलेला खिळा थेट सुनील तायडे यांच्या पोटात आरपार शिरल्याने गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव झाला.
घटना घडल्यानंतर त्यांच्या पत्नी दीपाली तायडे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील (Nashik) खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचे सांगून उपचार सुरू ठेवले असता, उपचारादरम्यान रात्री तायडे यांना तपासून डॉ. विशाल करवंदे यांनी मृत घोषित केले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाेलीस निरीक्षक अविनाश नडविनकेरी यांच्या सूचनेने तपास सुरु आहे.
ही घटना केवळ एक अपघात आहे की यात तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुकांचा काही संशयास्पद भाग आहे, यादृष्टीने पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. यात फायर कसा झाला आणि बटन कोणी प्रेस केले? गनचे ट्रिगर किंवा सेफ्टी लॉक अनावधानाने दाबले गेले की मशिनमध्ये तांत्रिक बिघाड होता, याचा शोध घेतला जात आहे. घटनेमागील नेमके सत्य समोर आणण्यासाठी फॉरेंसिक सायन्स (तज्ज्ञ) आणि तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून सखोल तपास केला जात आहे.