नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी):-खेळता खेळता बाथरूममध्ये गेलेल्या अवघ्या साडेअकरा महिन्यांच्या चिमुरडीचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. जेलरोडवरील पेंढारकर कॉलनीत ही हृदयद्रावक घटना घडली. रिवा राहुल ठाकरे असे मृत चिमुरडीचे नाव आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार दिवसांवर तिचा पहिला वाढदिवस होता. घरात आनंदाची तयारी होण्याआधीच काळाने घातलेल्या या घावामुळे ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
रिवा आई-वडिलांसह जेलरोड येथील पेंढारकर कॉलनीतील शेवंती बंगल्यात राहत होती. तिचे वडील राहुल ठाकरे हे के. जे. मेहता शाळेत शिक्षक असून, आई लीना ठाकरे या युनियन बँकेच्या जेलरोड शाखेत व्यवस्थापक आहेत. रिवा घरात खेळत असताना रांगत बाथरूममध्ये गेली. तेथे ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत ती पडली.
ही बाब लक्षात येताच वडील राहुल ठाकरे यांनी तातडीने तिला उपचारासाठी बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. अवघ्या चार दिवसांवर पहिला वाढदिवस असलेल्या रिवाच्या जाण्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार एस. ए. हिवाळे तपास करीत आहेत.