सप्तशृंगी गड घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट
सप्तशृंगी गड घाटात स्विफ्ट कारने घेतला पेट
img
दैनिक भ्रमर
नाशिक : सप्तशृंगी गड घाटातील गणपती पॉइंटजवळ शनिवारी (दि. १२) रात्री साडेआठच्या सुमारास दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या स्विफ्ट कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसून कार मात्र आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भाविक स्विफ्ट कार क्रमांक MH 12 KN 8625 ने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात होते. घाट चढत असताना कारचे इंजिन गरम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यामुळे चालकाने वाहन थांबवून पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अचानक कारने पेट घेतल्याचे समजते.

कारला आग लागल्याने घाट परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच नांदुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी रोपवेचे कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. पोलिसांनी बॅरिकेड्स लावून वाहतूक नियंत्रणात आणली. अग्निशमन वाहन व टँकरच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली; मात्र आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली.

आगीच्या पार्श्वभूमीवर नांदुरी पोलिस चौकीकडून घाटातील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या भाविक व वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सप्तशृंगी गड घाटातील रस्त्याच्या दुरुस्ती व काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रशासनाने दि. १० सप्टेंबर ते २६ सप्टेंबरपर्यंत शनिवार व रविवार वगळता घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group