नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- विवाहित असलेल्या शिक्षिकेला तत्कालिन विद्यार्थ्याने प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यासोबतचे अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, आरोपी चेतन राठोड ज्या महाविद्यालयात शिकत होता त्या महाविद्यालयात पिडीत शिक्षिका ही अधिव्याख्याता म्हणून कार्यरत होती. पिडीतेची बदली झाल्यानंतर चेतनने तिच्याशी ओळख वाढवून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन त्याने पिडीतेसोबत खासगी व अश्लिल व्हिडिओ रेकॉर्ड केले. आपल्यासोबत महाराष्ट्राबाहेर एक आठवडाभर ट्रीपला येण्यासाठी त्याने तिच्याकडे आग्रह धरला.
तिने नकार देताच तुझ्या कुटुंबाला आपल्या संबंधाची माहिती, व्हिडिओ कॉल्स आणि चॅट्स दाखवेल, अशी धमकी त्याने दिली. नंतर चेतनने तिच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. पिडीतेने पैसे देण्यासही नकार दिल्याने चेतनने पिडीतेच्या बहिण व वहिणीला सर्व माहिती सांगेल, अशी धमकी देऊन तो सांगेल तसे वागण्यास सांगितले. तसे न झाल्यास तो समाजात पिडीता व तिच्या कुटुंबाची बदनामी करेल, अशी धमकी दिली.
हा प्रकार डिसेंबर 2021 ते 3 ऑक्टोबर 2026 दरम्यान घडला. चेतनच्या या मानसिक त्रासाला कंटाळून पिडीतेने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रमोद वाघ करीत आहे.