नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- कर्णबधिर मुलांना घेऊन जाणारी बस थेट शेडमध्ये शिरल्याची घटना आज पंचवटी परिसरातील रामवाडी पुलाजवळ घडली. या अपघातात सुदैवाने गाडीमधील मुलांचा जीव वाचला.
याबाबत अधिक माहिती अशी, की सिडकोतील पडसाद कर्णबधिर विद्यालयाची बस विकास हरी दिघे हा चालक विद्यार्थ्यांना घेऊन आज दुपारच्या सुमारास घेऊन जात होता. पंचवटीतून अशोकस्तंभाकडे जाताना पुलाजवळ वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटला.
बस आधी डिव्हायडरच्या पोलला धडकली. नंतर ही बस थेट पुलाच्या कडेला असलेल्या एका शेडमध्ये शिरली. त्यावेळी बसने एमएच 15 एफव्ही 7422 या क्रमांकाच्या दुचाकीला अक्षरश: फरफटत नेले. दुचाकीवरील महिला या अपघातात जखमी झाली. महिलेची दुचाकी बसच्या पुढील चाकात अडकून गेली होती. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये काही मुले होती. त्यांना नंतर रिक्षाने पाठविण्यात आले.
पंचवटी पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात घडल्याचा दावा संस्थेच्या एका पुरुष प्रतिनिधीने केला. या बसमधून कर्णबधिर मुलांना नेण्यात येत होते. त्यांना नेताना बस सुस्थितीत आहे की नाही, याची खात्री करण्याची जबाबदारी संस्थाचालकांची होती. त्यांनी बसची स्थिती पाहून त्यानंतरच मुलांना बसमधून पाठवायला हवे होते.
घटनास्थळी पंचवटी पोलीस दाखल झाल्याने त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
संस्था चालक महिलेचा उद्धटपणा
या अपघाताबाबत माध्यम प्रतिनिधींनी तेथे उपस्थित असलेल्या संस्थाचालकाला अपघाताबाबत माहिती विचारली असता त्या महिलेने उत्तर दिले तर नाहीच, वरून ती उद्धटपणे बोलत होती. वरून प्रतिनिधींचीच चौकशी करण्याचा प्रयत्न तिने केला. अशा बेजबाबदार संस्थाचालकांवर देखील कारवाई व्हायला हवी.