नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- शहर आणि परिसरात बंद घरे लक्ष्य करून घरफोडी करणाऱ्या मुंबईतील एका सराईत टोळीचा नाशिकरोड गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ रेकॉर्डवरील आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून नाशिक व रायगड जिल्ह्यातील तब्बल ११ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपींकडून २४ लाख १२ हजार ७०० रुपये किमतीची २०० ग्रॅम सोन्याची लगड, चोरीसाठी वापरलेली वाहने आणि हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
२० ऑगस्ट रोजी जेलरोड येथील योगेश्वर नंदन अपार्टमेंटमधील हेमंत सोनवणे यांच्या बंद घरात घरफोडी झाली होती. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे नाशिकरोड युनिट समांतर तपास करत होते.
तपासादरम्यान अंमलदार सुशांत दिघे आणि केतन सोनवणे यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक संशयित चारचाकी व दुचाकी वेगवेगळ्या गल्लीत फिरताना दिसली. शहर पोलिसांच्या स्मार्ट शहराच्या कॅमेऱ्यांच्या मदतीने वाहनांचा क्रमांक मिळवून मालकाचा शोध घेतला असता, तो मानखुर्द (मुंबई) येथील असल्याचे निष्पन्न झाले.
नाशिकरोड युनिटच्या पथकाने तात्काळ मुंबई गाठून शोध घेतला असता, संशयित संजय कांबळे उर्फ सलीम अब्दुल लतीफ शेख पोलिसांच्या हाती लागला. त्याने नाशिकमध्ये घरफोड्या केल्याची कबुली दिली.
त्यानंतर तांत्रिक तपासाच्या आधारे इतर साथीदार शिर्डी-मनमाड मार्गाने नाशिककडे येत असल्याचे समजताच पोलिसांनी आडगाव ट्रक टर्मिनल येथे सापळा रचला. तेथून विनोद पवार, संजय कांबळे आणि तौसिफ गोरमे या तिघांना दुचाकी आणि घरफोडीच्या हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले.
अटक केलेल्या आरोपींनी चोरी केलेले सोने मानखुर्द आणि विरार येथे विकल्याचे कबूल केले.
त्यानुसार पोलीस पथकाने मुंबई व विरार येथून १५० ग्रॅम व ५० ग्रॅम अशी एकूण २०० ग्रॅम सोन्याची लगड हस्तगत केली. आरोपी हे मुंबईतील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर घरफोडी, गाडीच्या काचा फोडून चोरी करणे आणि पोलीस बतावणी करण्याचे १५ ते १६ गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, दिवसा व रात्री घरफोड्या केल्यानंतर रात्री झोपण्यासाठी ते स्वतःच्या वॅगन आर गाडीचाच वापर करत असत.
या टोळीने नाशिकमध्ये केलेल्या इंदिरानगर पोलीस ठाणे (०४), नाशिकरोड (०३), उपनगर पोलीस ठाणे (०२), देवळाली कॅम्प पोलीस ठाणे (०१) आणि कर्जत पोलीस ठाणे (जिल्हा रायगड) येथील ०१ अशा ११ गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड युनिटचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक संदीप पवार, हरसिंग पावरा, दिलीप भोई, मंगल जगताप, अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप व गुंडा विरोधी पथकाने ही कामगिरी केली. आरोपींकडून राज्यातील आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.