नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- दत्त मंदिर सिग्नलवर वाहतुकीचे नियम मोडून सुसाट कार चालवणाऱ्या एका २२ वर्षीय चालकाने, कारवाईसाठी समोर आलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर कार घालून त्याला थेट बोनेटवर घसरवत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सुदैवाने या घटनेत पोलिसाने बोनेट घट्ट पकडून ठेवल्याने मोठा अपघात टळला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखा युनिट ४ चे पोलिस हवालदार सुधीर राजाराम काकड (वय ४७) हे सायंकाळी सुमारे ६ वाजता दत्त मंदिर सिग्नलवर वाहतूक व्यवस्था सांभाळत होते. याच दरम्यान संशयित चालक वैभव ज्ञानेश्वर दांडे (२२, मूळ रा. कावणई, ता. इगतपुरी, सध्या रा. ग्रॅज्युएट वडापाव दुकान, रविवार कारंजा) हा आपल्या स्विफ्ट डिझायर कारमधून (MH 15 JH 6577) प्रवासी घेऊन भरधाव वेगाने जात होता.
संशयित चालकाने सिग्नल मोडून दत्त मंदिर सिग्नलकडून मोटवाणी रोडकडे जाणाऱ्या एका महिला दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. हे सर्व पाहताच कर्तव्यावर असलेले हवालदार काकड यांनी कार थांबवण्यासाठी चालकाला इशारा केला आणि कारच्या बोनेटवर हात ठेवून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
पोलिस कर्मचारी बोनेटवर आहे हे पूर्णपणे माहित असूनही, संशयित वैभव दांडे याने कार थांबवण्याऐवजी अचानक वेग वाढवला आणि गाडी पुढे पळवली. पोलिस हवालदार काकड यांनी प्रसंगावधान दाखवत कारचे बोनेट घट्ट पकडून ठेवले, ज्यामुळे त्यांचा जीव वाचला. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून पोलिसाच्या अंगावर गाडी घालणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.