पंडित कॉलनीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात घरफोडी; आठ किलो चांदीच्या वस्तू लंपास
पंडित कॉलनीत प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या बंगल्यात घरफोडी; आठ किलो चांदीच्या वस्तू लंपास
img
दैनिक भ्रमर

नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- घरातील कुटुंबीय झोपले असताना अज्ञात चोरट्याने किचनची काचेची खिडकी उघडून घरात प्रवेश करून घरात असलेल्या आठ किलो वजनाच्या चांदीच्या विविध वस्तू असा 2 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना पंडित कॉलनीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी करण राजेंद्र शहा (रा. अरिहंत बंगला, न्यू पंडित कॉलनी, शरणपूर रोड) हे बांधकाम व्यावसायिक असून, दि. 14 जुलै रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास सर्व कुटुंबीय झोपले होते. ही संधी साधून अज्ञात इसमाने किचनच्या बाहेरील पॅसेजमध्ये लोखंडी ग्रीलवरून उडी मारून किचनची काचेची खिडकी उघडून घरात प्रवेश केला.

त्यानंतर किचन ट्रॉलीचे ड्रॉवर उघडून त्यात असलेले 1 लाख 50 हजार रुपये किमतीचे 5 किलोग्रॅमचे चांदीचे पाच डिनर सेट, 60 हजार रुपये किमतीचे दोन किलो वजनाचे चांदीचे दोन जग, चार हजार 500 रुपये किमतीच्या चांदीच्या वाट्या, तीन हजार रुपये किमतीचा शंभर ग्रॅम वजनाचा चांदीचा चमचा, 4 हजार 500 रुपये किमतीचा दीडशे ग्रॅमचा चांदीचा ग्लास, साडेचार हजार रुपये किमतीची दीडशे ग्रॅमची चांदीची डिश, 7 हजार 500 रुपये किमतीचे 250 ग्रॅमचे चांदीचे बाऊल व तीन हजार रुपये किमतीचा शंभर ग्रॅमचा चांदीचा काटा असा एकूण 2 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेला.

या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार करीत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group