"त्या" बालिकेच्या मृत्यूप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी व अधीक्षिका निलंबित
img
चंद्रशेखर गोसावी

कळवण : विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेतील इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या सृष्टी ओंकार सूर्यवंशी (वय ८) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मुलगी आजारी असल्याची माहिती पालकांना वेळेवर देण्यात आली नाही आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आदिवासी विकास विभागाने संबंधित दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले असून, सृष्टीच्या पालकांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे.

सृष्टीला ३ सप्टेंबर रोजी ताप व उलट्यांचा त्रास झाल्याने मोकमभणी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर तिला आश्रमशाळेत आणण्यात आले. मात्र, ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने तिला कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री २.२७ वाजता तिला मृत घोषित केले.

या घटनेची कळवण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, शवविच्छेदन व वैद्यकीय अहवालानंतर ते निश्चित होणार आहे.
दरम्यान, पालकांनी शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत मुलगी आजारी असल्याची माहिती वेळेवर का देण्यात आली नाही, शाळेत तिच्यावर कोणते उपचार झाले आणि रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला का, याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

पालकांच्या आरोपांची गंभीर दखल घेत आदिवासी विकास नाशिकचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी भगवान वसंत निकम, शिक्षण विस्तार अधिकारी, कळवण आणि स्मिता प्रल्हाद गायकवाड, अधीक्षिका, विसापूर आश्रमशाळा यांना निलंबित केले आहे. तसेच सृष्टीच्या पालकांना शासनातर्फे दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

या कारवाईमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आजारी विद्यार्थ्याला तातडीने उपचार, पालकांना वेळेवर माहिती आणि जबाबदारी निश्चित करण्याची यंत्रणा प्रभावी आहे का, याची प्रशासनाला आता तपासणी करावी लागणार आहे.
इतर बातम्या
उद्या

Join Whatsapp Group