नाशिक महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक यावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सातत्याने तपासणी व दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्याच्या दृष्टीने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विविध भागांमध्ये विशेष धडक मोहिमा राबविण्यात येत आहेत.
या अनुषंगाने महापौर श्रीमती हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, पंचवटी प्रभाग समिती सभापती श्रीमती रोहिणी पिंगळे, आयुक्त श्रीमती मनीषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधित प्लास्टिकविरोधातील कारवाईस प्राधान्य देण्यात येत आहे.
पंचवटी विभागीय कार्यालय अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत मा. श्री. डॉ. आवेश पलोड, संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. श्री. किरण त्रिकम मारू, विभागीय स्वच्छता निरीक्षक, पंचवटी यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट यार्ड) परिसरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान मार्केट यार्ड परिसरातील विविध ठिकाणी तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये एकल वापरास प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या सुमारे १,००० किलो (१ टन) तसेच प्रतिबंधित प्लास्टिक कंटेनर सुमारे १,१७० किलो असा एकूण २,१७० किलो (२.१७ टन) प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले.
सदर कारवाईमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री व साठवणूक करणाऱ्या संबंधितांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करून एकूण १०,००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेले प्रतिबंधित प्लास्टिक महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यात आले असून त्याबाबत नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
सदर विशेष धडक मोहिमेमध्ये पंचवटी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शहरातील प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, पर्यावरणाचे संरक्षण करणे तसेच प्लास्टिक कचऱ्यामुळे नाले, गटारी व जलवाहिन्यांमध्ये निर्माण होणारे अडथळे टाळणे यासाठी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पंचवटी विभागातील बाजारपेठा, व्यापारी आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, दुकाने, विक्री केंद्रे व इतर व्यावसायिक ठिकाणी नियमित तपासणी व विशेष धडक मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
नागरिक व आस्थापनांना आवाहन
नाशिक शहर स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त ठेवण्यासाठी नागरिक तसेच व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक आस्थापना, बाजारपेठेतील विक्रेते व इतर संबंधित घटकांनी महानगरपालिकेच्या प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी मोहिमेस सहकार्य करावे.
नागरिकांनी खरेदी करताना प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या स्वीकारू नयेत व त्याऐवजी कापडी पिशवी, कागदी पिशवी किंवा इतर पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा. तसेच आपल्या कुटुंबात, परिसरात व समाजामध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करावी.
त्याचप्रमाणे व्यापारी व व्यावसायिक आस्थापनांनी प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या किंवा इतर प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य ग्राहकांना देऊ नये, त्याची विक्री अथवा साठवणूक करू नये. ग्राहकांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून देऊन प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आस्थापनांमधून निर्माण होणारा प्लास्टिक कचरा रस्त्यावर, नाल्यात, गटारीत अथवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून महानगरपालिकेच्या कचरा संकलन व्यवस्थेकडे सुपूर्द करावा.
नागरिक व आस्थापनांनी प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री किंवा साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत महानगरपालिकेच्या संबंधित विभागास माहिती देऊन कारवाईस सहकार्य करावे.
“स्वच्छ नाशिक – सुंदर नाशिक – प्लास्टिकमुक्त नाशिक” हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनासोबत नागरिक व आस्थापनांचा सक्रिय सहभाग अत्यंत आवश्यक आहे. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, विक्री अथवा साठवणूक करणाऱ्या व्यक्ती व आस्थापनांविरुद्ध यापुढेही नियमानुसार तपासणी, जप्ती व दंडात्मक कारवाई सातत्याने करण्यात येणार आहे.
नाशिक शहर स्वच्छ व पर्यावरणपूरक ठेवणे ही महानगरपालिका प्रशासनासोबतच नागरिक व आस्थापनांचीही सामूहिक जबाबदारी असून, सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत करण्यात येत आहे.