"त्या" अपघाताबाबत मनपाने दिले "हे" स्पष्टीकरण
img
दैनिक भ्रमर
सिद्धार्थनगर येथील कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ पाण्याच्या पाइपलाइनच्या कामासाठी रस्त्यावर आडवे टाकलेले काळे पाइप अंधारात व पावसामुळे दुचाकीस्वारांना न दिसल्याने त्यावर दुचाकी आदळून झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला.

सिद्धार्थ गोरे (रा. साईराम उपेंद्रनगर, सिडको) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचा मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी रात्री सुमारे अकराच्या सुमारास गंगापूर रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

या अपघातानंतर महानगरपालिकेच्या वतीने अधीक्षक अभियंता यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सिद्धार्थ नगर येथे घडलेली अपघाताची घटना दुर्दैवी आहे आणि दुःखद देखील आहे. 

सिद्धार्थ नगर येथे ज्या परिसरात अपघाताची घटना घडली त्या ठिकाणी रस्ता बंद करणेत येऊन पाईपलाईन टाकणेचे काम सुरू आहे. 

रस्त्यात पाईप टाकलेला असला तरी त्याला सुरक्षितता म्हणून रिफ्लेक्टर लावून दक्षता घेण्यात आलेली आहे.

अपघात ग्रस्त गाडीची परिस्थिती बघितल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की गाडी प्रचंड भरधाव वेगाने होती.

सदर रस्त्याचे काम सुरू आहे. त्या ठिकाणी इतकी भरधाव वेगाने गाडी कशी चालवली गेली. सदर ठिकाणी ५० मीटर अंतरावर रस्ता बंद असलेबाबत आवश्यक सुचना लावलेली आहे. 
सदर घडलेल्या घटनेचे बाबत लगतच्या परीसरातील सी.सी. टी.व्ही. फुटेज प्राप्त करणेची कारवाई सुरू आहे. 

सदर रस्त्यावर सर्व लाईट सुरु असुन देखील सदर दुचाकी अतीशय वेगाने धडकली आहे. सदर व्यक्तीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट प्रतिक्षेत आहे. 

तरीही संबंधित घटनेची चौकशी करून यात दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे अधीक्षक अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभाग यांनी कळविले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group