रामवाडीत मद्याच्या नशेत कारचालकाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्यावर उभ्या असलेल्या चौघांना उडविल्याने झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल रात्री सव्वा अकराच्या सुमारास फिर्यादी शुभम रमेश क्षीरसागर (वय 27) हा त्याचा भाऊ सौरभ (वय 17), मित्र सागर कापडे व कुसूम कापडे हे रामवाडीतील श्रद्धा पार्क जवळ गप्पा मारत उभे होते. त्यावेळी संशयित चेतन संतोष विसपूते हा एम.एच.15 जी.ए.7821 या क्रमांकाची इनोव्हा कार भरधाव वेगात चालवत आला. स्पीडब्रेकर न दिसल्याने तसेच गाडीवरील ताबा सुटल्याने विसपुतेने थेट या चौघांना जोराची धडक दिली.
या अपघातात सागर कापडे याच्या पोटाला व इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाल्याने त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर शुभम क्षीरसागर, सौरभ क्षीरसागर व कुसूम कापडे यांना डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पोलिसांनी गाडीचालक चेतनला ताब्यात घेतले आहे. वाहन चालविताना चेतनने मद्य सेवन केले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातात इनोव्हाच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, शुभम् क्षीरसागर याच्या अॅक्टिव्हाचेदेखील नुकसान झाले आहे.