नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- सप्तशृंगगड परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. नवरात्रोत्सवाचा बंदोबस्त आटोपून परतणार्या पोलिसांच्या पथकाला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात वाहतूक शाखेच्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. या अपघातात 11 हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे पोलीस दल आणि परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळली आहे. सुरक्षेसाठी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहे. नांदुरी गावातील अभोणा चौफुलीवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यासाठी परिसरात बॅरिकेडिंगही करण्यात आले होते.
हा बंदोबस्त आटोपून पोलीस आणि संबंधित पथक निघाले असताना, वणीच्या पुढे नांदुरीकडे जाणार्या मार्गावर एका भरधाव कारने नियंत्रण सुटल्याने बंदोबस्तावरील पोलिसांना आणि तिथे उपस्थित असलेल्यांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यात अनेक जण गंभीर जखमी झाले.
या अपघातात गंभीर जखमी झालेले वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातानंतर तत्काळ सर्व जखमींना उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असलेल्या काहींना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.