पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; 1.68 लाखांच्या ड्रग्जसह दोघांना बेड्या
पेठ रोडवर एमडी विक्रीचा प्रयत्न फसला; 1.68 लाखांच्या ड्रग्जसह दोघांना बेड्या
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- पेठ रोडवरील म्हसरूळ भागात एमडी (मेफेड्रोन) या अमली पदार्थाची तस्करी आणि विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. अमली पदार्थ विरोधी पथकाने आज पहाटे ही धडक कारवाई करत 1 लाख 68 हजार रुपये किमतीचा 56 ग्रॅम एमडी साठा जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेठ रोडवरील अश्वमेधनगर रिक्षा स्टँडसमोरील मोकळ्या पटांगणात, नामको हॉस्पिटलच्या पुढे काही तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्याआधारे पथकाने काल रात्री  साडेआठच्या सुमारास सापळा रचण्यात आला होता. 

यावेळी संशयास्पदरित्या वावरणाऱ्या दर्शन गोरख गायकवाड (वय 22) आणि रोशन दिनकर लोखंडे (वय 23, दोघे रा. मातोरी गाव, ता. जि. नाशिक) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दर्शन याच्याकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे बाळगलेला 1 लाख 68 हजार रुपयांचा 56 ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार संतोष सौंदाणे यांच्या फिर्यादीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना आज पहाटे 4:21 वाजता अटक करण्यात आली आहे. 

ही कामगिरी अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके, पोलीस उपनिरीक्षक दीपक पठारे, अमोल म्हस्के, पोलीस अंमलदार मनोज आहेर, प्रमोद गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. व्ही. चौधरी करत आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group