सिटीलिंककडून सोमवारपासून
सिटीलिंककडून सोमवारपासून "या" तीन मार्गांवर ई-बसेसची सेवा सुरू
img
दैनिक भ्रमर
नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक व प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) मार्फत इलेक्ट्रिक बसेस टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येत आहेत.

सिटीलिंकच्या ई-बसेस सेवा विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात २ ई-बसेस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आणखी ११ ई-बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या. या सेवेला पुढे विस्तार देत तिसऱ्या टप्प्यात आणखी ९ ई-बसेस सोमवार, दिनांक ३० नोव्हेंबर २०२६ पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील या ई-बसेस शहरातील विविध भागांना जोडणाऱ्या खालील तीन मार्गांवर धावणार आहेत.

१. मार्ग क्रमांक ३४२ – आडगाव डेपो ते गंगापूर गाव
आडगाव डेपो येथून जत्रा हॉटेल, शालिमार, के.टी.एच.एम. कॉलेज व आनंदवल्ली मार्गे गंगापूर गाव आणि पुन्हा त्याच मार्गाने आडगाव डेपो.

२. मार्ग क्रमांक ३६३ – सी.बी.एस. ते भुजबळ नॉलेज सिटी
सी.बी.एस. येथून हिरावाडी, अमृतधाम मार्गे भुजबळ नॉलेज सिटी आणि पुन्हा त्याच मार्गाने सी.बी.एस.

३. मार्ग क्रमांक ३७४ – आडगाव डेपो ते पाथर्डी गाव
आडगाव डेपो येथून द्वारका, महामार्ग व कला नगर मार्गे पाथर्डी गाव आणि पुन्हा त्याच मार्गाने आडगाव डेपो.

सिटीलिंकच्या टप्प्याटप्प्याने सुरू होणाऱ्या या ई-बसेस वातानुकूलित (AC) असून, प्रवाशांना अधिक आरामदायी व सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. विशेष म्हणजे, या वातानुकूलित ई-बसेसच्या सेवेसाठी प्रवाशांच्या तिकीट दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. या ई-बसेसचे भाडे सिटीलिंकच्या सीएनजी बसेसच्या प्रचलित भाडेदराप्रमाणेच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना कोणताही अतिरिक्त आर्थिक भार न पडता सीएनजी बसच्या भाड्यातच वातानुकूलित ई-बसेसच्या आधुनिक व आरामदायी प्रवासाचा लाभ घेता येणार आहे.

सिटीलिंकच्या ई-बसेस सेवेमुळे नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक आधुनिक स्वरूप प्राप्त होत असून, पर्यावरणपूरक वाहतुकीला प्रोत्साहन मिळत आहे. ई-बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना आरामदायी, सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा सिटीलिंकचा प्रयत्न आहे.

सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढविणे, शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यास हातभार लावणे तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने स्वच्छ व शाश्वत वाहतूक व्यवस्था विकसित करणे, हा सिटीलिंकच्या ई-बसेस सेवा विस्तारामागील प्रमुख उद्देश आहे.

आगामी काळातही ई-बसेसची सेवा टप्प्याटप्प्याने विस्तारित करण्यात येणार असून, नाशिककरांना अधिक दर्जेदार, आधुनिक व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिटीलिंक कटिबद्ध आहे.

नाशिककर प्रवाशांनी सिटीलिंकच्या अन्य बसेस सोबतच नव्याने सुरू होणाऱ्या वातानुकूलित ई-बसेस सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) यांच्या वतीने करण्यात येत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group