नाशिक - नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने तीस हजार रुपये मागून महसूल विभागातील अधिकाऱ्यांना फसविण्याचा प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून झाला आहे. योगायोगाने सर्व अधिकारी एकाच ठिकाणी असल्यामुळे हा प्रकार फसला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नावाने एक व्हॉट्सॲप संदेश आला आणि तो संदेश महसूल विभागाच्या सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला. हा संदेश पाठवताना संबंधित व्यक्तीने महसूल विभागाच्या त्या ग्रुपमध्ये योग्य पद्धतीने जाईल याची पूर्णपणे काळजी घेतल्याचे दिसून येते.
त्या संदेशामध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तीस हजार रुपये पाठवावे काही वेळानंतर ते पैसे परत करण्यात येतील असे देखील सांगण्यात आले होते. हा संदेश सर्व अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांच्यासमोरच जिल्हाधिकारी असताना त्यांनी हा व्हॉट्सॲप मेसेज का केला हे कोडे महसूल विभागातील सर्व अधिकाऱ्यांना पडले होते. यातील एका अधिकाऱ्याने ही बाब जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निदर्शनास आणून दिली.
ज्या व्यक्तीने हा संदेश महसूल विभागाच्या व्हॉटसॲप ग्रुप वरती टाकला त्यावेळी योगायोगाने जिल्हाधिकारी कार्यालयातच सर्व महसूल विभागाचे अधिकारी स्वतः जिल्हाधिकारी हे नियोजन समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असल्यामुळे एकाच ठिकाणी एकाच कक्षामध्ये होते.
त्यामुळे हा संदेश खोटा असल्याचे लक्षात आले. यासंदर्भामध्ये तातडीने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून याचा खुलासा करून घेतला आणि हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याशी चर्चा केली आणि सायबर क्राईम पोलीस ठाण्याची संपर्क साधून याबाबतचा गुन्हा हा दाखल करण्यात आला.
या विषयावर बोलताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, माझ्या नावाने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडे 30 हजार रुपये मागण्याची गोष्ट ही खरी आहे. याबाबत सर्वांनी सतर्क राहावे, अशा कोणत्याही स्वरूपाचा संदेश आला तर आपल्या ओळखीच्या परिचित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा सरळ जिल्हाधिकारी म्हणून माझ्याशी संपर्क साधावा. हा मेसेज खोटा असून कोणीही पैसे पाठवू नये, असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, अशा स्वरूपाचा कोणताही संदेश मी तयार केलेला नाही.