नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) : कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या विचाराने घर सोडून नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आलेल्या १८ वर्षीय तरुणाला लोहमार्ग पोलिसांनी वेळीच हेरून ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने त्याची विचारपूस करून त्याला विश्वासात घेतले, त्याचे समुपदेशन केले आणि त्यानंतर त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. लोहमार्ग पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बारावीचे शिक्षण पूर्ण केलेला भोजराज मीनानाथ बागुल (वय १८ वर्षे १ महिना, रा. पारधाडी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याचे वडिलांसोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. पाहुण्यांनी दिलेल्या ५०० रुपयांपैकी १५० रुपये हरवल्याच्या कारणावरून वडिलांनी त्याला दोन चापटा मारल्या. या प्रकारामुळे भोजराज संतप्त झाला. रागाच्या भरात आणि भावनेच्या आहारी जाऊन त्याने घर सोडले आणि थेट नाशिकरोड रेल्वे स्थानक गाठले. त्यानंतर तो रेल्वे रुळांच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले.
दरम्यान, नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर एक तरुण अस्वस्थ व घाबरलेल्या अवस्थेत फिरताना लोहमार्ग पोलिसांच्या निदर्शनास आला. हवालदार योगेश पाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याच्याशी अत्यंत संयमाने व आपुलकीने संवाद साधण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला शांत असलेल्या भोजराजने पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर आपले नाव, पत्ता तसेच वडिलांचा मोबाईल क्रमांक पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता त्याच्या वडिलांशी संपर्क साधला आणि त्यांना नाशिकरोड लोहमार्ग पोलीस ठाण्यात बोलावून घेतले.
पोलिसांनी भोजराजचे समुपदेशन करताना आयुष्याचे मोल समजावून सांगितले. क्षणिक राग किंवा कौटुंबिक वादातून घेतलेला टोकाचा निर्णय संपूर्ण कुटुंबासाठी किती वेदनादायी ठरू शकतो, याची जाणीव त्याला करून देण्यात आली. त्यानंतर त्याची सुरक्षितता सुनिश्चित करून त्याला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. यापूर्वीही तो दोन वेळा रागाच्या भरात घरातून निघून गेल्याची माहिती समोर आली आहे.
“तरुणाची मानसिक अवस्था ओळखून त्याच्याशी प्रेमाने आणि विश्वासाने संवाद साधणे महत्त्वाचे होते. त्याने माहिती दिल्यानंतर तत्काळ पालकांशी संपर्क साधला. वेळेत हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला,” अशी माहिती लोहमार्ग पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन बनकर यांनी दिली.
लोहमार्ग पोलिसांनी दाखविलेली सतर्कता, प्रसंगावधान आणि संवेदनशील हाताळणी यामुळे एका तरुणाचा संभाव्य जीवितहानीपासून बचाव झाला. पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.