नाशिक येथील TCS प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ निर्माण केली होती. दरम्यान आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे.
या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित विनायक खरकर यांनी हा आदेश देत आरोपींना तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर कोणताही दबाव न आणणे आणि न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित विनायक खरकर यांनी रझा रफीक मेमन , आसिफ आफताब अन्सारी, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी , शफी भिकन शेख आणि तौसिफ बिलाल अत्तार यांच्या जामीन अर्जांना मंजुरी दिली. मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या विविध गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन देण्यात आला आहे. आरोपींना जामीन दिल्यास ते साक्षीदारांना धमकावतील किंवा पुराव्यांमध्ये छेडछाड करतील, अशी गंभीर शक्यता नसल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाने जामीन देताना काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत, त्यामध्ये:
जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. त्यानुसार, खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आरोपींनी संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावणे बंधनकारक राहील.
तसेच, आरोपींना तक्रारदार महिलेच्या कार्यस्थळाजवळ किंवा राहत्या परिसरात जाण्यास, तिच्याशी किंवा साक्षीदारांशी संपर्क साधण्यास तसेच प्रकरणाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीशी संपर्क ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे.
दरम्यान, TCS नाशिक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक छळ, सक्तीच्या धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि मानसिक छळाशी संबंधित एकूण नऊ गुन्ह्यांचा विशेष तपास पथक (SIT) तपास करत आहे. याप्रकरणी TCS कंपनीने स्पष्ट केले आहे की, कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारच्या छळवणूक किंवा सक्तीविरोधात 'शून्य सहनशीलता' धोरण आहे. तसेच, लैंगिक छळाच्या आरोपांमध्ये नाव आलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.