नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांवरून वाद सुरु असून खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचा बळी गेला आहे. दरम्यान आता अचानक भर रस्त्यात मोठं भगदाड पडलं असून अवजड ट्रक त्यात फसला असल्याची घटना आज घडली आहे.
शहरातील नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाळी गटार योजनेच्या पाइपलाइनजवळ अचानक रस्ता खचल्याने अवजड ट्रक थेट जमिनीत फसला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नसली तरी पुन्हा एकदा महापालिकेच्या कारभारवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच उपमहापौर विलास शिंदे, नवशा गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव तसेच इतर नगरसेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महापालिका प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर ट्रक बाहेर काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित पाइपलाइन व रस्त्याची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे