आजकाल अनेक विचित्र आणि विश्वास ना बसणाऱ्या घटना घडत असून आता एका व्यक्तीने चक्क तिसऱ्या कागसाठी आपल्या गर्भवती पत्नीला नदीत ढकलून दिलं असलायची भयंकर घटना घडली आहे.
पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी ही अत्यंत संतापजनक घटना झारखंडची राजधानी रांचीमधून समोर आली आहे. तिसऱ्या लग्नासाठी उतावीळ झालेल्या एका नराधम पतीने आपल्या दोन-तीन महिन्यांच्या गर्भवती पत्नीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पत्नी आपल्या लग्नात अडसर ठरत असल्याने पतीने तिला चक्क राढू नदीच्या तीव्र प्रवाहात ढकलून दिले. मात्र, दैव बलवत्तर म्हणून पोहता आल्यामुळे या महिलेचा जीव वाचला आहे.
मूळचे बुंडू थाना क्षेत्रातील राहणारा आरोपी सुरेश महतो उर्फ मिथुनजय महतो असे या कुकर्म करणाऱ्या पतीचे नाव असून, तो लखीमनी नावाच्या गर्भवती पत्नीचा पती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेशचे आधीच लग्न झाले होते, तरीही त्याने लखीमनीसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, त्याचे अन्य महिलेवर प्रेम जडले आणि त्याला तिसरे लग्न करायचे होते. यात त्याची गर्भवती पत्नी लखीमनी अडथळा ठरत होती. तिला कायमचे संपवण्यासाठी त्याने एक भयानक कट रचला.
पतीने आधी आपल्या पत्नीला पर्यटनाच्या बहाण्याने जोन्हा फॉल येथे नेले. तिथून तिला दरीत ढकलून हा अपघात असल्याचे भासविण्याचा त्याचा बेत होता. मात्र, तिथे पर्यटकांची गर्दी जास्त असल्यामुळे त्याचा हा प्लॅन यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर तो पत्नीला घेऊन अनगड़ा थाना क्षेत्रातील पैका जोडा पुलाजवळ पोहोचला. तिथे लघुशंकेचे बहाण्याने त्याने मोटारसायकल थांबवली आणि राढू नदीच्या काठावर नेऊन तिला थेट पाण्याच्या तीव्र प्रवाहात ढकलून दिले. पत्नीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असावा, असे समजून आरोपी आपला मोबाईल फोन स्विच ऑफ करून तिथून फरार झाला.
रात्रभर बेटावर काढली वेळ नदीच्या प्रवाहात ढकलल्यानंतर देवाने जणू या महिलेला नवीन आयुष्यच दिले. लखीमनी यांना पोहता येत होते. पाण्याच्या तीव्र प्रवाहात पोहत पोहत त्या नदीच्या मधोमध असलेल्या एका बेट सदृश्य जागेवर जाऊन अडकल्या. भयानक पाऊस आणि अंधारात त्यांनी ती पूर्ण रात्र तिथेच काढली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी नदीकाठी गेलेल्या ग्रामीण नागरिकांना टापूवर एक महिला अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने आणि अथक परिश्रमांनंतर त्या गर्भवती महिलेला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अनगड़ा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पीडित महिला लखीमनी यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपी पती सुरेश महतोविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ पोलिसांनी बुंडू आणि इतर संभाव्य ठिकाणी छापेमारी तीव्र केली असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.