चार वर्षाचा चिमुकला खेळता खेळता कारमध्ये शिरला अन् पुढे घडलं अत्यंत भयंकर...
चार वर्षाचा चिमुकला खेळता खेळता कारमध्ये शिरला अन् पुढे घडलं अत्यंत भयंकर...
img
Nandini khandare More
घरासमोर खेळत असणाऱ्या चिमुकल्यासोबत एक अत्यंत भयंकर घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेळता खेळता शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या एका चार वर्षीय चिमुकल्याचा कारमध्येच गुदमरून करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे घडली. अंश सुरज केळझरकर (वय अंदाजे ४ वर्षे) असे या मृत चिमुकल्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंश घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या एका कारमध्ये शिरला. मात्र, त्याला कारचे दार आतून उघडता न आल्याने तो आतच अडकून राहिला. अंश घराच्या परिसरातच खेळत असावा, असा समज कुटुंबीयांचा झाल्यामुळे ही बाब सुरुवातीला कोणाच्याही लक्षात आली नाही. बराच वेळ उलटूनही अंश दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधशोध सुरू केली. घराजवळ आणि परिसरात शोध घेतल्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या बंद कारमध्ये तो बेशुद्धावस्थेत आढळून आला. कडक उन्हात बराच वेळ बंद कारमध्ये राहिल्याने त्याचा श्वास गुदमरला होता.

कुटुंबीयांनी त्याला तातडीने घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे ऑक्सिजन उपलब्ध नव्हता असा गंभीर आरोप नातेवाइकांनी केला आहे. अंशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवणे आवश्यक होते. परंतु, सरकारी रुग्णवाहिकाही वेळेवर उपलब्ध झाली नाही.

अखेर सामाजिक कार्यकर्ते मुज्जू पटेल यांच्या खाजगी रुग्णवाहिकेची मदत घेऊन अंशला यवतमाळला नेण्यात आले. मात्र, तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंशचे वडील रोजमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या अवघ्या चार वर्षांच्या चिमुकल्याच्या अकाली मृत्यूमुळे केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group