कुत्रा भुंकल्याने घाबरून घरात पळालेल्या तीन वर्षीय चिमुकलीचा चुलीवरील गरम दूध अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात घडली आहे. दुर्गा असं या चिमुकलीचं नाव होतं. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याने बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरासमोर खेळत असताना कुत्रा भुंकल्याने घाबरून घरात पळालेल्या दुर्गा या चिमुकलीच्या अंगावर चुलीवर तापवण्यासाठी ठेवलेले गरम दूध पडले. या दुर्घटनेत ती गंभीररीत्या भाजली. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कुत्र्याच्या भीतीने घरात पळाली अन् घडली दुर्घटना
मिळालेल्या माहितीनुसार, दुर्गा घरासमोर खेळत होती. त्याचवेळी एक कुत्रा भुंकत तिच्या दिशेने येऊ लागला. कुत्र्याला पाहून घाबरलेल्या दुर्गाने घराच्या दिशेने धाव घेतली. मात्र, घराच्या अंगणात चुलीवर तापवण्यासाठी ठेवलेल्या दुधाच्या पातेल्याला तिचा धक्का लागला. त्यामुळे गरम दुधाने भरलेले पातेले तिच्या अंगावर पडले आणि ती गंभीररीत्या भाजली.
घटनेनंतर कुटुंबीयांनी दुर्गाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असतानाच तिची प्राणज्योत मालवली. या अनपेक्षित घटनेमुळे नांदूर हवेली परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
दुर्गाच्या कुटुंबीयांसाठी हा आघात अधिक वेदनादायी ठरला आहे. दसऱ्याच्या दिवशीच तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. मात्र, काही दिवसांतच तिच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
वाढदिवसाच्या दिवशी दुर्गाने मोठी झाल्यानंतर डॉक्टर होण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. भविष्याबाबत स्वप्ने पाहणाऱ्या या चिमुकलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.