हल्ली गुन्हेगारीच्या प्रमाणात चिंताजनक वाढ होत चालली आहे.अनेक घटना उघडकीस येत असून आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री घडलेल्या एका दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथील कृष्णानगर परिसरात जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यात वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर कुटुंबातील अन्य दोघे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. देवीच्या दर्शनावरून सुरू झालेला वाद नेमका कसा वाढला? या रक्तरंजित घटनेमागे काय कारण होते? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण.
छत्रपती संभाजीनगरमध्ये देवीच्या दर्शनावरून सुरू झालेल्या वादातून रक्तरंजित थरार घडला. वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव शेणपुंजी येथे घटना घडली. मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून मदतीसाठी धावलेल्या वडील आणि भावाची धारदार शस्त्रांनी हल्ला करून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबासाहेब रामदास कीर्तिकर (वय ४३) आणि त्यांचा मुलगा निहाल (वय १७) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील पाच संशयित आरोपींना पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णानगर परिसरात राहणारे बाबासाहेब कीर्तिकर हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होते. त्यांचा मुलगा साहिल हा मध्यरात्री परिसरातील सार्वजनिक देवीच्या मंडपात दर्शनासाठी गेला होता. दर्शन घेऊन परतत असताना घरासमोर थांबल्याच्या कारणावरून राजेंद्र गयचंद आणि त्याचा मुलगा नागेश यांनी त्याच्याशी वाद घातला. या वादातून साहिलला लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली.
साहिलचा आवाज ऐकून त्याचे वडील बाबासाहेब तसेच भाऊ निहाल आणि कुणाल घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, परिस्थिती आणखी चिघळली. आरोपानुसार, शानो गयचंद हिने घरातून चाकू आणून दिला, तर अन्य आरोपींनी लाकडी दांडे आणि टिकावाने हल्ला केला. यावेळी नागेशने बाबासाहेब आणि निहाल यांच्यावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. अतिरक्तस्रावामुळे दोघांचाही मृत्यू झाला. कुणाल आणि साहिल हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर आरोपी हरियाणाकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई करून राजेंद्र, मनोज, नागेश, मानसी आणि शानो गयचंद या पाच जणांना अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास सुरू आहे.