महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. दिवंगत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाविरोधात लैंगिक छळाच्या आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे.
ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या मुलाच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अरुण सपकाळ यांच्या विरोधात हा धक्कादायक आरोप झाल्याने अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या सावित्रीबाई फुले महिला स्वयंसिद्धा संस्थेतील एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप सिंधुताईंचा मुलगा अरुण सपकाळ यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी सपकाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हा कथित प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील कलम ७८, ७९, ३५१(२) तसेच पॉक्सो कायद्यातील कलम ६ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चिखलदरा पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले असून, घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याशी संबंधित संस्थेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासाअंती स्पष्ट होणार आहे.