नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- रस्त्याच्या कडेला कार उभी करुन चहा पिण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने कारच्या दरवाजाची काच फोडून कारमध्ये ठेवलेली 20 लाखांची रोकड चोरुन नेल्यची घटना राका गार्डनजवळ घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी अंबादास पोपट घुगे (रा. कलानगर, जेलरोड) हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असून, त्यांच्या कामाची 20 लाख रुपयांची रक्कम त्यांचा मित्र संजय पटेल याच्याकडून इंद्रकुंड येथून घेऊन फिर्यादी हे एम.एच.15 सी.टी. 2888 या क्रमांकाच्या टाटा सफारी कारमध्ये त्यांचा मित्र रमेश कटारे व मनोहर ढोकणे यांच्यासह राका कॉलनी येथे चहा पिण्यासाठी आले होते.
त्यावेळी घुगे यांनी आपली कार राका गार्डनच्या मेनगेटसमोर व सेंट्रल बँकेच्या रोडच्या बाजूला पार्क केली आणि घुगे हे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले. त्या दरम्यान दोन अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या कारच्या डाव्या बाजूच्या मधल्या बाजूची काच फोडून दरवाजा उघडला व कारमध्ये असलेली 20 लाख रुपयांची रोकड बॅगेसह लंपास केली.
याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दोन इसमांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहे.