काही घटना अत्यंत धक्कादायक हादरवणाऱ्या आणि तितक्याच संतापजनक असतात. अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉकवर २५ ऑक्टोबर रोजी रात्री एका पित्याने आपल्याच पोटच्या गोळ्याला स्कायवॉकवरून खाली फेकून दिले असल्याची अत्यंत संतापजनक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून संतापलेल्या पतीने आपल्याच नऊ महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला स्कायवॉकवरून खाली फेकून दिले. या दुर्दैवी घटनेत बाळ गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी बाळाला उपचारासाठी तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. सध्या तिथे त्याच्यावर अ उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला तात्काळ अटक केली आहे. कौटुंबिक वादातून एका पोटच्या गोळ्यावर असा अमानुष प्रसंग ओढवल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.