२९ सप्टेंबर २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याचा राग आल्याने दोन युवकांनी चहाच्या दुकानाचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना नाशिकरोड येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी किशोर बापू गवळी (रा. प्रणाली सोसायटी, जेलरोड, नाशिकरोड) हे दि. 28 सप्टेंबर रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास नाशिकरोड बस स्टॅण्डच्या समोर चहाचा गाळा लावून चहा विक्रीचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी सनी भाटिया, धीमा श्रीवंत (दोघे रा. सुभाष रोड, नाशिकरोड) हे फिर्यादीकडे आले. त्यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने सनी भाटिया याने त्याच्या कमरेला असलेला लोखंडी चॉपर काढून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये फिर्यादीला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी “तू जर आम्हाला पैसे दिले नाहीत, तर तू तुझे दुकान येथे कसा चालवितो, हे आम्ही पाहतोच,” असे बोलून दमदाटी केली,
तसेच फिर्यादीच्या शेजारी असलेल्या चहाच्या दुकानावरील संजय साठे हे भांडण सोडविण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही दमदाटी केली व दोघांच्या चहाच्या दुकानाचे नुकसान केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात भाटिया व श्रीवंत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
Copyright ©2026 Bhramar