२१ सप्टेंबर २०२६
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- हॉटेल मॅनेजरने बिअर व जेवणाचे पैसे मागितले असता चार ते पाच जणांनी हॉटेल मॅनेजरकडे खंडणी मागून काऊंटरमधून तीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नरेश राजू सहार (मूळ रा. उत्तराखंड, ह. मु. नाशिक) हे पाथर्डी फाटा येथील हॉटेल साईकिरणचे मॅनेजर म्हणून काम पाहतात. आरोपी अजय दहेकर, प्रिन्स पालवे व इतर तीन जण दि. 20 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता हॉटेलमध्ये आले होते. हॉटेलमध्ये त्यांनी बिअरचा आस्वाद घेत जेवणावर ताव मारला.
वेटरने त्यांच्याकडे जेवणाचे बिल मागितले असता आरोपींपैकी एकाने “मला अजय भाई बोलतात. कोणत्याही पोलीस स्टेशनला जाऊन अजय दहेकरचे रेकॉर्ड चेक कर. या एरियात लोक मला हप्ता देतात आणि तू माझ्याकडे बिल मागतोस. तुला जगण्याची इच्छा राहिली नाही वाटतं?” असे बोलत त्याने धमकी दिली. त्या टोळक्यामधील एकाने कमरेला लावलेला चाकू काढून “मला प्रिन्स पालवे म्हणतात,” असे बोलत सहार यांच्या मानेवर चाकू ठेवून “पाच हजार रुपये काढ, नाही तर तुला इथंच बोकडासारखं कापून टाकतो,” अशी धमकी दिली. नंतर त्याने चाकू हवेत फिरवत “कोणी मध्ये आलं तर इथंच कापून टाकीन,” असे म्हणून दहशत निर्माण केली. त्यावेळी दहेकरसोबत आलेल्या इतर तिघांनी हॉटेलच्या काऊंटरमधून तीन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करीत आहेत.
Copyright ©2026 Bhramar