नाशिकमध्ये मन हेलावणारी घटना ! आई वडील कामावर असताना घरात दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू
नाशिकमध्ये मन हेलावणारी घटना ! आई वडील कामावर असताना घरात दोन चिमुकल्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू
img
Nandini khandare More
नाशिकमधून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. आई वडील कामावर असताना घराच्या गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तृप्ती विशाल सोनवणे (वय 8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय 6) अशी मृत मुलींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील रासबिहारी मेरी लिंकरोड परिसरातील मानेनगरातील शुभम कॉलनीत ही ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शुभम कॉलनीत डॉ. विशाल सोनवणे हे कुटुंबासह राहत होते. रासबिहारी मेरी लिंकरोडवर त्यांचे क्लिनिक आहे. त्यांच्या पत्नीही वैद्यकीय व्यवसायात त्यांना मदत करतात. शनिवारी सायंकाळी सोनवणे दाम्पत्य क्लिनिकमध्ये रुग्णांवर उपचार करत होते. त्यावेळी दोन्ही मुली घरी होत्या. रात्री एका रुग्णाला सलाईन लावण्यात आले होते. सलाईन सुरू असल्याने डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिकमध्येच थांबण्यास सांगितले आणि ते घरी गेले.

घरी पोहोचल्यानंतर त्यांनी दोन्ही मुलींना जेवण दिले. त्यानंतर 'आई लगेच घरी येईल', असे सांगून त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा उघडा ठेवला आणि घराला बाहेरून कुलूप लावून पुन्हा क्लिनिकमध्ये परतले. काही वेळाने रुग्णाची सलाईन संपल्यानंतर डॉ. सोनवणे यांनी पत्नीला क्लिनिक बंद करून घरी जाण्यास सांगितले. पत्नी घरी पोहोचून दरवाजा उघडून आत गेल्या. मात्र, दोन्ही मुली नेहमीप्रमाणे घरात दिसत नसल्याने त्यांना संशय आला. यानंतर त्यांनी घरात आणि परिसरात मुलींचा शोध सुरू केला. गॅलरीतील पाण्याच्या टाकीचे झाकण उघडे असल्याने टाकीबाबत संशय आल्याने त्यांनी आत डोकावून पाहिले.

त्यावेळी एका मुलीचे केस पाण्यावर तरंगताना दिसले. त्यांनी तातडीने मुलीला टाकीतून बाहेर काढले. त्यानंतर दुसरी मुलगीही त्याच टाकीत असल्याचे त्यांनी पहिले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दोन्ही मुलींना बाहेर काढल्यानंतर तातडीने पतीला फोन करून घटनेची माहिती दिली. घर आणि क्लिनिकमधील अंतर लक्षात घेता डॉ. सोनवणे यांनी शेजारी राहणारे अमोल पोतदार आणि इतर नागरिकांना मदतीसाठी घटनास्थळी पाठवले. शेजाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मुलींना रात्री सुमारे 10.35 वाजता अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोन्ही बहिणींना मृत घोषित केले. या घटनेने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group