गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत असतानाच आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचे आगमन झाल्याने सर्वजण सुखावले आहेत. गणरायाच्या आगमनासोबत दडी मारलेल्या पावसामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण झाले आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे सध्या राज्यात पावसाने जोर धरला आहे. रविवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. कोकणासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. आज देखील हवामान खात्याने अनेक जिल्ह्यात हलका ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर जिल्ह्यासह आसपासच्या तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. तर राज्यातील उर्वरीत जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाऊस गायब झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसह नागरिक चिंतेत आले होते. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळाचे सावट आहे. पाऊस नसल्यामुळे पिकं करपून चालली आहेत. त्यामुळे बळीराजा संकटात आहे. अशातच आता गणरायाच्या आगमनासोबत राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. पुढच्या काही दिवस असाच पाऊस कायम राहावा अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) मान्सूनोत्तर हंगामानत ३ मोठी चक्रीवादळे तयार होण्याचा इशारा दिला आहे. गेल्या ४४ वर्षांत आलेल्या चक्रीवादळापेक्षा मोठा तडाखा बसण्याची शक्यता इस्रोने व्यक्त केली. मान्सूनोत्तर हंगामात उत्तर हिंद महासागरात ३ चक्रीवादळे तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. विदर्भातील कमी दाबाच्या क्षेत्रापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा विस्तारला असल्याची माहिती समोर आली आहे.