अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर मंदिराच्या ट्रस्टमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेत. याबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.आता अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या सीईओची नेमणूक करण्यात आलीय. भारतीय हवाई दलातील अनुभवी अधिकारी जितेंद्र मिश्रा यांच्या खांद्यावर सीईओची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
ही नियुक्ती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण जितेंद्र मिश्रा हे राम मंदिराचे पहिले सीईओ असणार आहेत. या उच्च पदासाठी जितेंद्र मिश्रा यांच्या नावाची शिफारस एका विशेष निवड समितीने केली होती. या समितीमध्ये तीन प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश होता: निवृत्त न्यायाधीश प्रमोद कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णूकांत चतुर्वेदी आणि प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. सुरेश हावरे. या त्रिसदस्यीय समितीने अनेक नावांचा विचार केल्यानंतर जितेंद्र मिश्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीमुळे राम मंदिराच्या प्रशासकीय कारभाराला एक नवीन दिशा मिळेल अशी अपेक्षा आहे. मंदिराच्या दैनंदिन व्यवस्थापनात आणि भविष्यातील योजनांमध्ये त्यांचा अनुभव मोलाचा ठरेल. राम मंदिराच्या इतिहासातील ही एक नवीन सुरुवात असून, त्यांच्या नेतृत्वाखाली मंदिराच्या कार्याला गती मिळेल अशी आशा आहे.