देशभरात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असून सध्या अनेक भीषण असे अपघात घडत आहेत. दरम्यान आता तेलंगणामध्ये एक अत्यंत भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात बुधवारी पहाटेच्या सुमारास डोराकुंटा परिसराजवळ एका भरधाव खाजगी ट्रॅव्हल्सच्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कंटेनर लॉरीला मागून जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्दैवी दुर्घटनेत 6 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 20 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ही खाजगी बस 43 प्रवाशांना घेऊन तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथून आंध्र प्रदेशातील विजयवाड्याच्या दिशेने जात होती. बुधवारी पहाटे 5:20 वाजण्याच्या सुमारास दुर्गापुरम स्टेज आणि डोराकुंटा भागाच्या हद्दीजवळ हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडक इतकी जोरदार होती की बसमधील अनेक प्रवासी आतच अडकून पडले
अपघातात मृत्यू झालेल्या 6 व्यक्तींमध्ये 5 महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आणि बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
या दुर्दैवी दुर्घटनेवर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून मृतकांच्या कुटुंबांप्रती आपल्या संवेदना प्रकट केल्या. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना तात्काळ आदेश देऊन जखमींना त्वरित व उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार देण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय, अधिकाऱ्यांनी जखमींच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवावे, असे निर्देशही त्यांनी दिले. पोलिसांनी या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अपघाताच्या अचूक कारणाचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरु केला.