महामार्गावर दाट धुक्यामुळे भीषण दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याने एकापाठोपाठ तब्बल ५० वाहनांची जोरदार धडक झाली. या भीषण साखळी अपघातात ११ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
बल्गारियामध्ये मंगळवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. पूर्व बल्गारियातील महामार्गावर दाट धुक्यामुळे सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण जखमी झाले आहेत. हा अपघात राजधानी सोफिया ते बर्गास शहराला जोडणाऱ्या A1 महामार्गावर घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघात इतका भीषण होता की महामार्गावरील सहाही मार्गांवर कार आणि ट्रकचा खच पडला होता.
अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर काही वाहने उलटली होती. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी विमानांचीही व्यवस्था करण्यात आली. बल्गारियाचे पंतप्रधान रुमेन रादेव यांनी या घटनेला मोठी दुर्घटना म्हटले आहे. त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघाताच्या वेळी परिसरात दाट धुके असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.